लोकमान्य हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : नागरिकांनी संवेदनशील होऊन अपघातग्रस्तांना मदत करावी. रिक्षा चालकांनी यात महत्वाची कामगिरी बजवावी. उन्हातान्हामध्येही आपले काम निष्ठेने करणार्या पोलिसांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पिंपरी कॅम्पमधील वाहतुकीची स्थिती पाहून लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रशासकीय अधिकार्याची योजना आखून नियोजन करावे. दुचाकी चालकांनी मेंदुचे प्रत्यारोपण होत नाही हे लक्षात ठेवून हेल्मेट वापरावे. लोकमान्य हॉस्पिटलसारख्या संस्थेच्या सामाजिक जाणीव प्रकल्पाला हातभार लावा व अपघातमित्र ही शहरभर चळवळ करावी, असे आवाहन आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केले. त्यांनी प्रचंड कौतुक केले.
वाहतूक पोलिस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमान्य हॉस्पिटल यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या 29 व्या रक्षा सुरक्षा अभियानातंर्गत अपघातग्रस्तांना मदत करणार्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना ‘अपघात मित्र’ हे ओळखपत्र व सन्मानपत्र देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, वाहतूक पोलिस आयुक्त राजेंद्र आंबरे, आयुक्त सतीश पाटील, निरक्षक विजय पळसुले, महामार्ग निरीक्षक हागवणे, परिवहन अधिकारी विधाते, निरिक्षक पवार, लोकमान्य हॉस्पिटलच्या डॉ. सोनाली लोहकरे, ट्रॉमा विभाग प्रमुख डॉ. आशिष सूर्यवंशी, डॉ. श्रीकृष्ण जोशी, सुनील काळे आदी उपस्थित होते.
आमदार चाबुकस्वार पुढे म्हणाले की, रस्त्यावरील फर्स्ट रेस्पॉडर म्हणून कार्यरत राहणार्या रिक्षा चालकांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. डॉक्टर व पोलिस, सामाजिक संस्थेबरोबर एकत्र येऊन काम करतात हे सुजाण समाजाचे लक्षण आहे. पोलिस हा सुद्धा माणूस असून तो अत्यंत संवेदनशील असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेशांनी नागरिकांनी प्रथम अपघातग्रस्तांना मदत करावी. पोलिस कोणतीही चौकशी न करता सहकार्य करतील. अपघातामध्ये आपल्या देशात सर्वाधिक बळी हे पादचार्यांचे जातात. तसेच वाहनचालकांचा वेगावरील बेजबाबदारपणा याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून रास्ता सुरक्षा ही चळवळ निर्माण व्हायला हवी, असे मत उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी व्यक्त केले.