अपघात रोखण्यासाठी पालिका आखणार उपाययोजना

0

पुणे । शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांत शहरात वेगवेगळ्या 22 ठिकाणी 210 अपघात झाले आहेत. या 22 ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. भविष्यातील अपघात रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे पत्र वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून महापालिका पथ विभागाला देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणांची पाहणी करून तातडीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका पथ विभागाकडून देण्यात आली आहे.

शहरातील खासगी वाहनांची संख्या वाढली असून शहरात दरडोई एक खासगी वाहन आहे. मात्र, त्या तुलनेत शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. त्यातच, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात वाहनचालकांना अपयश येत असल्याने शहरातील अपघात प्रवणक्षेत्रांची संख्या वाढत आहे.

रस्ता सुरक्षा ऑडीट
अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा ऑडीट करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या या ब्लॅक स्पॉटचा त्यात समावेश केला जाणार आहे. या ठिकाणी होणार्‍या अपघाताबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यातील अनेक ठिकाणी अपघातांची संख्या मोठी असल्याने त्या भागात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यांच्या रचनेत बदल तसेच उड्डाणपुलही प्रस्तावित करण्यात आलेले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

माई मंगेशकर रुग्णालयासमोर सर्वाधिक अपघात
वारजे-माळवाडी येथील माई मंगेशकर रुग्णालयासमोर सर्वाधिक अपघात झाले आहेत. या ठिकाणच्या सेवा रस्त्यावरून अनेक वाहने पुणे-बेंगलुरू महामार्गावर येतात. तसेच या रस्त्यावरून अनेक नागरीक रस्ता ओलांडतात त्यामुळे त्यांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. याठिकाणांशिवाय, याच रस्त्यावर डुक्कर खिंडीजवळ 14 अपघात झाले असून खडी मशिन चौकात 20, तर फुरसुंगी उड्डाणपूलावर 13 अपघात झाले आहेत. कात्रज चौकात 13, मुठा नदी पुलावर आणि वडगावपूलावर प्रत्येकी 11, तर नवले पुलावर 10 अपघात झाले आहेत. संगमवाडी बस पार्किंग, रामटेकडी, करिष्मा चौक, वाल्हेकर चौक या ठिकाणी प्रत्येकी 5 अपघात झाले आहेत. याशिवाय, दरीपूल आणि नगर रस्त्यावरील हयात हॉटेल समोर 9 अपघात झालेले असून सादलबाबा चौक, खराडी बायपास, तेलाची मोरी, गंगाधाम, गाडीतळ हडपसर चौकात प्रत्येकी 7, डायसप्लॉट येथे 8 तर जेधे चौकात 6 अपघात झालेले आहेत.