अपत्य प्राप्तीचा मोह टाळा; सरकारी नोकरी मिळवा

0

नवी दिल्ली । वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी देशात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आसाम सरकारनेही आपल्या लोकसंख्या धोरणाच्या मुसद्याची घोषणा रविवारी केली. या मसुद्यातील धोरणानुसार आसाममधील नागरिकांना केवळ दोन अपत्येच जन्माला घालता येणार आहेत. दोनपेक्षा जर अधिक अपत्ये जन्माला घातली, तर त्या दाम्पत्याला सरकारी नोकरीला मुकावे लागणार आहे. त्यामुळे अपत्य प्राप्तीचा मोह टाळा, सरकारी नोकरी मिळवा, असाच सरकारचा पवित्रा, असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्याना, तिसर्‍या अपत्याच्या धोरणासोबतच आसाम सरकारने इतरही अनेक धोरणांबाबत माहिती दिली आहे. आसाम सरकारच्या धोरणानुसार, राज्यातील सर्व मुलांना विद्यापीठ स्तरापर्यंतचे सर्व शिक्षण मोफत दिले जाणार आहे. आसामचे आरोग्य मंत्री हिमांता विश्‍व शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसंख्या धोरणाबाबतचा हा मसुदा जाहीर केला.

या धोरणानुसार दोनपेक्षा अधिक मुले असल्यास संबंधित व्यक्तींना सरकारी नोकरी दिली जाणार नाही. तसेच, दोनपेक्षा अधिक अपत्ये जन्माला घालणार नाहीत, ही अट पूर्ण करणार्‍या व्यक्तीलाच यापूढे शासकीय नोकरीत घेतले जाईल. तसेच, ही अट नोकरी मिळवणार्‍या व्यक्तींना आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पाळावी लागणार आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. त्यामुळे जर सरकारी नोकरी हवी असेल, तर तिसर्‍या अपत्याचा मोह टाळावाच लागणार आहे.

इतर गोष्टीसांठीही हीच अट
केवळ सरकारी नोकरीच नव्हे, तर आसामच्या नागरीकांना इतरही अनेक गोष्टींसाठी तिसर्‍या अपत्याबाबतचा नियम पाळावा लागणार आहे. जसे की, ट्रॅक्टर देणे, घरकुल योजनेचा लाभ मिळवणे याशिवाय इतर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास दोन अपत्यांची अट लागू असणार आहे. पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उभे राहणार्‍या उमेदवारांनाही ही लोकसंख्या धोरणाच्या मसुद्यातील ही अट लागू असणार आहे. त्यामुळे आता किमान असाममध्येतरी तिसरे अपत्य शासकीय योजनांचा फायदा मिळवण्यात अडसर ठरणार आहे.