भोसरी :- अपना वतन संघटनेच्या वतीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर श्राद्ध आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने दारूच्या बाटलीला पुष्पहार घालून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणावी व अवैध धंदे बंद करण्याची सदबुध्दी त्यांना यावी अशी प्रार्थना करण्यात आली., “
पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारांना व अवैध धंदयांना पोलिसांच्या व राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अभय मिळाले आहे. प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनसुद्धा पोलीस याची गांभीर्याने दखल घेत नाही. पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ठिकाणाहून संपूर्ण शहरात अवैध दारू पुरवठा होतो. तरी पोलीस त्यावर कारवाई करीत नाहीत .त्यामुळे पोलीस उपायुक्तांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे, संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले. आंदोलनानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना निवेदन देण्यात आले व भोसरी परिसरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिंगाडे यांनी अवैध धंदे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल व कारवाईचा अहवाल वेळोवेळी सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अपना वतन संघटनेचे सचिव दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष राजू शेरे, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संपर्क प्रमुख हरिशचंद्र तोडकर, प्रवक्त्या सॅन्ड्रा डिसोझा, ज्येष्ठ पत्रकार फ्रान्सिस गजभिये, चिंचवड विभाग प्रमुख फारुख शेख, भोसरी विभाग प्रमुख चांद सय्यद, भारिपचे अकील सय्यद ,दिवेश पिंगळे, सतीश कदम, अस्लम शेख, तौफिक पठाण, बाळू अडागळे, शिवाजी धोत्रे, अनिल कारेकर, शेरखान पठाण, आरती कोळी, जमीर सय्यद, मन्सूर शेख आदी उपस्थित होते.