अपप्रवृत्तींकडून समाजात जातीय तेढ

0

बारामती । समाजात असहिष्णुता निर्माण करून विघातक कृत्य करण्याचा प्रयत्न मनुवाद्यांकडून होत आहे. त्यांचा हा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शहरातील मराठा सेवा संघाच्या जिजाऊ भवनमध्ये राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या पुतळ्याचे अनावरण अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवार बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती
या वेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी छत्रपती ग्रुपचे ड. रितेश सावंत, आबा सोळसकर, आबा सातव, अमरजित जगताप, सुयोग मुथा, सचिन सस्ते, संदीप निकम, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रसेन चव्हाण यांनी पाच लाखांची देणगी जाहीर केली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे यांनी प्रास्तविक केले. जिजाऊ भवनचे विश्‍वस्त ड. विजय तावरे यांनी आभार मानले.

महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्‍न
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, सध्या राज्यासह देशात महागाई, बेरोजगारी असे अनेक महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. मात्र, काही मनुवादी वृत्ती जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही परिस्थिती असहिष्णुता पसरणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मात्र, राज्यात काही शक्ती वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.