पुणे : मुलीला शिक्षा केल्याने जाब विचारणार्या पालकांनी शाळेत मारहाण केली. डोणजे भागातील एका शाळेत सर्वांसमोर घडलेल्या या घटनेमुळे व्यथित होऊन मुख्याध्यापकाने कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. 24 सप्टेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणात मुख्याध्यापकांच्या पत्नीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक कावरे (53, रा. रश्मी हाऊस, वडगाव) असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. याप्रकरणी कावरे यांची पत्नी वर्षा कावरे (49) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्षा कावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ पारगे, पूजा पारगे, रोहिणी कुंभार, बाळासाहेब पारगे, सुवर्णा चव्हाण (सर्व रा. डोणजे गाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक कावरे सिंहगड किल्लाच्या पायथ्यालगत असलेल्या डोणजे गावातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. या शाळेतील मुलीला 24 सप्टेंबर रोजी शिक्षा केली होती. मुलीने ही बाब पालकांना सांगितली़ तेव्हा पालक पारगे, कुंभार, चव्हाण शाळेत आले. त्यांनी शाळेत सर्वांदेखत कावरे यांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेमुळे इतकी वर्षे केलेल्या शिक्षकाच्या नोकरीवर धब्बा लागल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला़ अपमानित झालेल्या कावरे यांनी सिंहगड रस्ता भागातील कालव्यात उडी मारून आत्महत्या केली.