भुसावळ। विद्यार्थ्यांनी अपयशाची कारणमीमांसा केली पाहिजे. स्पर्धा परिक्षेत मानसिक क्षमतेचा कस लागतो. त्यामुळे अपयशाची कारणे शोधून यशाकडे वाटचाल करणे हाच यशाचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन आयएएस स्वप्नील पाटील यांनी केले. भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. महाविद्यालयाच्या ऑडिटोरियमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
2016 मध्ये झालेल्या युपीएससी परिक्षेत पाटील यांनी देशभरात 55 वा क्रमांक मिळवत आएएस रँक मिळवली. युपीएससी परिक्षेचा अभ्यासक्रम आणि अभ्यासातील बारकाव्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते कार्यक्रमाच्या सुरूवातील स्वप्नील पाटील यांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वसमावेशक अभ्यास महत्वाचा ठरतो. प्रत्येक घटकाचे आकलन झाल्यास परिक्षेतील यशाचा मार्ग सोपा होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकावर सारखेच लक्ष केंद्रीत करावे. एनसीईआरटीची पहिली ती बारावीपर्यंतची पाठ्यपुस्तके, संदर्भग्रंथ, इंग्रजी भाषेतील मासिके आणि साप्ताहिके यांचे अत्यंत बारकाईने वाचन यशासाठी आवश्यक असते, असेही त्यांनी सांगितले. डॉ.आर.बी.ढाके यांनी प्रास्ताविक केले. डॉ.दयाघन राणे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.श्रेया चौधरी यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.