नवी दिल्ली । नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खालेल्या बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. भाजप आणि मोदी सरकारला अपयश मिळायला लागले की सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते देवाचा आधार घेतात. देवदर्शनासाठी मंदिराच्या चकरा मारण्यास सुरुवात करतात, अशी बोचरी टीका मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
हरियाणा, पंजाब व चंदिगडमधील राजकीय स्थितीची माहिती घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर बोलताना त्यांनी केंद्र व भाजपशासित राज्यांकडून भगव्याचे तुष्टीकरण केले जात आहे. गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे देशातील वातावरण बदलले असल्याचे त्यांनी म्हटले. जेव्हा भाजप व मोदी सरकार जनहित, जनकल्याण व देशहितामध्ये अपयशी ठरताना दिसते. तेव्हा मोदी व भाजपचे आघाडीचे नेते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी देवदर्शन आणि मंदिराच्या चकरा मारण्यास सुरुवात करतात. सुरुवातीपासूनच भाजपकडून निवडणुकीच्या फायद्यासाठी धर्माचा वापर सातत्याने केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
पंजाबची भाजप व अकाली दलाच्या सरकारमधून सुटका झाली आहे. पण हरियाणामध्ये भाजपच्या कट्टरवादामुळे राज्य पुन्हा मागे जाताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. संवैधानिक पदांवर बसलेल्या लोकांकडून चुकीची भाषा वापरली जात आहे. त्यामुळे हरियाणातील भाजप सरकार कायम चर्चेत असते. तिथे दलितांबरोबरही राज्य सरकारची वागणूक योग्य नाही. हरियाणात दलितांचे शोषण व अन्याय सातत्याने सुरूच आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभव झाल्यानंतरही मायावती यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. ईव्हीएमवरील कोणतेही बटण दाबल्यानंतर मतदान फक्त भाजपलाच होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. निवडणूक आयोगाने मायावतींचा आरोप फेटाळला होता. त्यावेळी मायावतींनी न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले होते. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या मायावतींना विधानसभा निवडणुकीत खूप कमी जागा मिळाल्या होत्या.