अपयशानंतर विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये : महापौर काळजे

0

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगला कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड : शालेय जीवनात झालेले कौतुक हे कायम स्मरणात राहते. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेऊन आपला यशाचा आलेख उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत. अपयशानंतर विद्यार्थ्यांनी निराश न होता; पुन्हा जोमाने अभ्यास करून यश मिळावावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सोमवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिकेच्या विद्यालयातून शालांत परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, झामाबाई बारणे, अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, नगरसेवक शैलेश मोरे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, शिक्षणाधिकारी बजरंग आवारी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यालयीन अधीक्षक सोमा आंबवणे उपस्थित होते.

यशात सातत्य ठेवा
महापौर नितीन काळजे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. ज्याप्रमाणे दहावीत यश प्राप्त केले आहे. त्याप्रमाणे बारावी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणातही अशाच प्रकारचे सातत्य ठेवावे. अडचणी आल्यातरी निराश होऊ नका. अभ्यासात दुर्लक्ष व टाळाटाळ करू नका. वाम मार्ग स्वीकारु नका. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तुमच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीदेखील काळजे यांनी दिली.

यांचा झाला गुणगौरव
यावेळी 12 दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. 90 ते 100 टक्क्यांपर्यंत गुण प्राप्त केलेल्या सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाखाप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून सात लाख रुपयांचे वितरण यावेळी करण्यात आले. त्यामध्ये आकाश दुधाणे, शुभंकर वाघेरे, मयूर मोटे, पूनम शाहीर, शरणप्पा हनुमंता कोनमनी, यश मेश्राम, प्रीती कोते, ईश्वर पवार, रवी मांजरे, अनिकेत शिंगन, ऋतिक दास, रामेश्वर पोपळघट, ऋषिकेश गायकवाड, ऋषिकेश पाटील, इंद्रजित देशमुख, सुनील पवार, विनोद जाधव, भाग्यश्री सुतार, शीला बगाडे यांचा समावेश होता. माध्यमिक शालांत परीक्षेत 85 ते 89.99 टक्के गुण प्राप्त केलेल्या 20 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजारपर्यंत प्रोत्साहनपर बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तर, 80 ते 84.99 टक्के गुण प्राप्त करणार्‍या 43 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.