ठाणे । अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने 7 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. 2015 मधील वाडा तालुक्यातील हा प्रकार घडला होता. राधेशाम जगदीश चौरासिया (35) असे या आरोपीचे नाव असून मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध वाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने 10 हजार रुपये दंडही ठोठावला असून हा दंड भरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे न्यायालयाचा निर्णय
14 वर्षांच्या मुलीचे आरोपीने अपहरण करत तिला सुरुवातीला शिर्डीला नेले. नंतर हरिद्वारला घेऊन गेला. मुलीबरोबर लग्न करण्याचा आरोपीचा उद्देश होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी हरिद्वार रेल्वेस्थानकावर मुलीसह आरोपीला पकडले आणि वाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. या खटल्याचा अंतिम निकाल ठाणे सत्र न्यायालयात लागला आणि नायाधीश एस. सी. खलिपे यांनी आरोपीला सात वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.