अपहरणातील संशयिताला न्यायालयीन कोठडी

0

जळगाव । प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून कानळदा येथील तरुणाच्या अपहरणप्रकरणी संशयित हरीश बाळू सपकाळे याला सोमवारी जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्याला मुख्य न्यायादंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. कानळदा येथील नीलेश विष्णू भंगाळे (वय 29) याचे प्लॉट खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून 11 डिसेंबर रोजी अपहरण केले होते.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलिसांनी या प्रकरणी शरद माधव सपकाळे , सतीश विलास तायडे, प्रवीण प्रेमराज शिरसाळे , प्रवीण धनराज तायडे, सागर भीमराव सोनवणे यांना अटक केली होती. ते सध्या जामिनावर आहेत. तर या प्रकरणातील फरार असलेल्या हरीश बाळू सपकाळे (रा. जाकीर हुसेन कॉलनी) याला सोमवारी अटक केली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्याला न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.