मुंबई – पाच दिवसांपूर्वी कांदिवलीतून अपहरण केलेल्या एका तरुणीवर तिघांनी लैगिंक अत्याचार केल्याची तक्रारच बोगस असल्याचे उघडकीस आली आहे. खोटी तक्रारदार या तरुणीने चारकोप पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने तिच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई ठरविली जाईल असे एका अधिकार्याने बोलताना सांगितले. कांदिवली परिसरात राहणारी ही तरुणी महाविद्यालयात शिकते. गेल्या बुधवारी ती सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली. यावेळी तिच्याजवळ एक कार आली आणि कारमधील तीन तरुणांनी तिला महाविद्यालयात लिफ्ट देण्याचा बहाणा करुन कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यातील एकाने तिच्याशी लैगिंक चाळे करण्याचा प्रयत्न केला.
या तरुणाला पाहून इतर दोघांनाही अशाच प्रकारे तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. मढ येथे गेल्यानंतर तिला कारमधून फेंकून या तिघांनी पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने कारच्या दिशेने दगडफेक केला, मात्र तोपर्यंत ते तिघेही तेथून पळून गेले होते. या घटनेनंतर तिने रिक्षा पकडून चारकोप पोलीस ठाणे गाठले. तिथे उपस्थित पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरणासह बलात्काराचा गुन्ह नोंदविला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेची चारकोप पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील काही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र या फुटेजमध्ये अशी कुठलीही घटना समोर आली नव्हती. त्यामुळे या तरुणीच्या जबानीची पोलिसांकडून शहानिशा सुरु होती. यावेळी तिने दिलेली तक्रारच खोटी असल्याचे उघडकीस आले. तिच्या एका मित्राने तिच्या आईविषयी अपशब्द काढले होते. या मित्राला धडा शिकविण्यासाठी त्याने अपहरण आणि लैगिंक अत्याचार झाल्याचा बनाव केला होता. तिने पोलिसांत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्याविरुद्ध आता कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत तपास सुरु आहे. तपास पूर्ण होताच संबंधित माहिती येथील स्थानिक न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तसेच वरिष्ठांच्या सूचनेनुसार या तरुणीवर काय कारवाई करायची ते ठरविले जाईल असे एका अधिकार्याने सांगितले.