अपहार प्रकरणात धुळ्यातील दोन दिग्गजांसह सहा जणांची चौकशी

0

अमळनेर- धुळे येथील महामार्गावरील उड्डाण पुलात संपादित जमिनीचा वाढीव मोबदलाच्या आर्थिक अपहारप्रकरणी धुळ्यातील शिवसेना महानगर प्रमुख सतीश दिगंबर महाले, माजी नगरसेवक विनायक वालचंद शिंदे यांच्यासह सहा जणांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली व समज देऊन पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बछाव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, यासंदर्भात आमदार अनिल गोटे यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले असून या गैरव्यवहाराच्या चौकशी करावी, यासंदर्भात आगामी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पोलीस अधीक्षकांच्या सूचना
एकाचे अपहरण झाले असून ज्याचे अपहरण झाले आहे त्याच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी काही लोक एचडीएफसी बँकेत येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी 13 रोजी सकाळी अमळनेर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना ताबडतोब साध्या गणवेशात पोलीस घेऊन अमळनेर एच.डी.एफ.सी. बँकेत जाण्याच्या सूचना केल्या. त्यांनुसार पो.नि.अनिल बडगुजर यांनी प्रमोद बागडे, सुनील पाटील, किशोर पाटील, रवी पाटील विजय साळुंखे, योगेश महाजन, ज्ञानेश्‍वर सपकाळे यांना घेऊन ते बँकेत दबा धरून बसले होते. काही वेळानंतर बँकेत आलेल्या सतिश महाले व वालचंद शिंदे, जितेंद्र गंगाराम भिल, अनिल गुलाब खैरनार, बबलू सोनू मोरे, रुपसिंग गेंदा भिल यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, धुळे येथील बँकेतून 1 कोटी 95 लक्ष रुपये अमळनेरला ट्रान्स्फर झाले असल्याचे समजते तर भरत जाधव हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व बबलू मोरे हे शिरपूर येथील आदिवासी संघटनेचे अध्यक्ष असल्याचे समजते. रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक अमळनेरला येणार असल्याने संबधितांना धुळ्याहून अमळनेर पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण
अप्पर पोलीस अधीक्षक बच्छाव यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यातील पिंपरी येथील दिनेश विकास ठाकरे (ह मु रामबोरिस) यांच्या वडिलांची जमीन महामार्गावर उड्डाण पुलात संपादित झाली आहेफ तत्पूर्वी विकास ठाकरे यांनी ही जमीन धुडकू मोरे यांना विकली होती. त्यावेळी त्यांना 26 लाख रुपये मिळाले होतेफ त्या दरम्यान विकास ठाकरे यांचा मृत्यू झालाफ जमीन मात्र विकास ठाकरे यांच्या नावावरून वारसदार दिनेश ठाकरे यांच्या नावावर झाली. शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रकल्पात संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळणार असल्याचे कळताच धुळे येथील भरत जाधव यांच्यासह काही व्यक्तींनी दिनेशशी करार केला की वाढीव मोबदला मिळवून देतो, वाटून घेऊ. दिनेश चे यापूर्वी धुळे येथील एयू बँकेत खाते होते मात्र तेथे मर्यादित रक्कम निघत होती. म्हणून दिनेशने 29 मे 2018 रोजी अमळनेर येथील एचडीएफसी बँकेत खाते उघडले. अमळनेर येथे एक कोटी 28 लाख रुपये जमा झाले होते. त्यापैकी भरत जाधव यांनी 10 ते 12 लोकांच्या नावावर नेट बँकिंगच्या माध्यमातून 50 लाख रुपये वळते केले. याबाबत दिनेश ठाकरे यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, माझा भ्रमणध्वनी भरत जाधव यांच्या ताब्यात असून नेट बँकिंग व्यवहार त्यांनीच केले आहेत. या संदर्भात सहा जणांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली व नंतर समज देऊन पुन्हा बोलावण्यात येणार असल्याचे ही सांगितले. तसेच मोठा व्यवहार बँकेत झाला व इतरांचा काय सबंध ? यासाठी बँकेचे व्यवस्थापक व कर्मचार्‍यांनाही ही चौकशीसाठी बोलावले होते, सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे श्री बच्छाव यांनी सांगितले.

आमदार गोटेंनी उपस्थित केेेलेले प्रश्‍न
राष्ट्रीय महामार्गाबाबत यापूर्वी मी विधानसभेत या प्रकरणात 35 कोटींचा अपहार झाल्याचे बोललो होतो. तो प्रकार अमळनेरच्या आजच्या आर्थिक व्यवहाराच्या गुन्हयाच्या माध्यमातून हळूहळू बाहेर येत असल्याचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भ्रमाणध्वनिवरून बोलताना सांगितले, ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात आदिवासींची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. तर इतरांचे काय असा प्रश्‍न उपस्थित करून भाजप सरकारने पारदर्शी व्यवहार असल्याचे वारंवार सांगितले आहे. ते आता त्यांना सिद्ध करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणातील त्या आदिवासींची आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड धुळ्याचे असताना अमळनेरच्या बँकेत खाते उघडण्याचे कारण काय ? गेल्या आठ दिवसात त्या बँकेतील मुख्य व्यवस्थापकाशी 50 वेळा फोनवरून कोणी बोलणे केले, याबाबत पोलिसांनी चौकशी करावी, आगामी अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचेही गोटे म्हणाले.