पिंपरी येथील रमाईनगर पत्राशेडमधून तीन दिवसांपूर्वी गायब झालेली
एच. ए. मैदानावरील झुडपात आढळला मृतदेह
पिंपरी-चिंचवड : तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिंपरी मधील एच ए मैदानावर आढळला. मृतदेह आढळलेल्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. धनश्री गोपाळ पुणेकर (वय 7, रा. पत्राशेड, रमाबाईनगर, पिंपरी) असे मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव आहे. धनश्री बेपत्ता झाल्याची फिर्याद तिची आई अर्चना गोपाळ पुणेकर (वय 42, रा. पत्राशेड, रमाबाईनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली.
कुटूंब गरीब परिस्थितीतील
हे देखील वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, धनश्रीचे आई अर्चना आणि वडील गोपाळ दोघेजण सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी भाजी मंडईमध्ये गेले. दरम्यान धनश्रीचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. रात्री साडेसात वाजता आई-वडील भाजी घेऊन घरी आले. त्यावेळी त्यांची मुलगी घरी नव्हती. गोपाळ यांनी त्यांच्या भावाकडे चौकशी केली. तेंव्हा त्यांनी सांगितले की, ‘धनश्री आई-वडिलांच्या मागे गेली होती.’ म्हणून त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु धनश्री बाबत काहीच माहिती मिळाली नाही.
तीन दिवसांपासून शोध
सर्वत्र शोध घेतल्यानंतर मंगळवारी रात्री अर्चना यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या संबधित यंत्रणांनी धनश्रीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यात यश मिळाले नाही. आज गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपरी मधील एच ए मैदानावर लहान झुडुपांमध्ये आढळला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी
दरम्यान, धनश्री ज्या परिसरातून गायब झाली, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता धनश्री तिच्या शेजारी राहणा-या एका 30 वर्षीय इसमासोबत जात असल्याचे आढळले आहे. अपहरण, अत्याचार आणि खून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिंजवडी येथे दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला काही दिवस जातात तोच पुन्हा लहान मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.