अपहृत विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या; बेपत्ता मुलीचा शोध लागेना

0

नंदुरबार। बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहराच्या अन्य भागातून बेपत्ता झालेल्या मुलीचा तपास लागत नसल्याने पोलिस सतर्क झाले असून या दोन्ही घटनांचा आपसात संबंध आहे काय, याचा शोध पोलिस घेत आहेत. अक्षता जयेश बोरसे (वय 17) ही मुलगी चिरायू हॉस्पिटलकडे जाऊन येते, असे सांगून 5 जुलै रोजी सकाळी कुंभारवाडा परिसरातील घरून निघाली होती ती परत आलीच नाही. शोध घेऊनही ती सापडत नाही म्हणून जयेश बोरसे यांनी 7 जुलै रोजी रात्री शहर पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद नोंदवली.

जयेशची सायकल शाळेतच : दरम्यान एकलव्यनगरात राहणारे शिक्षक नंदकिशोर भिकनदास बोरसे यांनीही आपला मुलगा राज नंदकिशोर बोरसे (वय 15) याचे 7 जुलैरोजी अपहरण झाल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यांनी फिर्यादीत म्हटले की, राज बोरसे हा नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता सायकलने डी. आर. हायस्कूलमधे आला परंतु सायंकाळी साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे घरी परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता शाळेच्या आवारात त्याची सायकल लावलेली दिसली. परंतु तो कुठेच आढळला नाही म्हणून अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केल्याची फिर्याद बोरसे यांनी दिली.

शेतातील चारीत मृतदेह
तथापि आज सकाळी नंदुरबार शहरापासून दोन किमी अंतरावरच्या खामगाव शिवारालगत जिल्हा क्रीडासंकुलाजवळ एका शेतातील चारीत राजचा मृतदेह फेकलेल्या अवस्थेत आढळला. ही खबर मिळताच उपअधीक्षक रमेश पवार, अप्पर अधीक्षक वाघुंडे, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक गिरीष पाटील, शहर निरिक्षक बुधवंत आणि सहकार्‍यांनी तिथे भेट दिली. हाताचे ठसे घेणार्‍या पथकासह श्‍वानपथकानेही भेट देऊन माग काढला व धागेदोरे शोधण्यासाठी परीसर पिंजून काढला.

कारण अस्पष्टच
दरम्यान अपहृत मुलीच्या शोधार्थ वेगाने चक्र फिरवली जात आहेत. राज डी. आर. हायस्कूलचा इयत्ता 9 वीचा विद्यार्थी होता. शाळेच्या पदाधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट दिली व राजच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. राजचे वडील आणि आई; दोघेही जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक आहेत. राज बोरसे याची हत्या कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.