अपात्रता टळली ; भुसावळातील भाजपा नगरसेवकांना दिलासा

0

जनआधार विकास पार्टीचा अर्ज निकाली ; जिल्हाधिकार्‍यांनी दिला निर्णय

भुसावळ- भाजपाकडे नगरसेवकांचे पुरेसे संख्याबळ असतानाही अपक्ष नगरसेवक मुन्ना तेली यांना गटनेता केल्याने जनआधार विकास पार्टीने भाजपा नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. सुमारे 18 महिने या याचिकेवर चाललेल्या कामकाजानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी ही याचिका निकाली काढल्याने भुसावळातील भाजपा नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मिळाला दिलासा
अपक्ष नगरसेवकाला गटनेता केल्याप्रकरणी जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे व नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे भाजपा नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह भाजपाच्या 29 नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू नये? या आशयाची नोटीस बजावली होती. डिसेंबर 2017 पासून सुरु असलेल्या प्रकरणावर जिल्हाधिकार्‍यांनी याचिकाकर्ता व सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे जाबजबाब घेतले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी 7 जून रोजी तक्रारदारांचा तक्रारी अर्ज नामंजूर करण्याचे आदेश दिले. हा तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी 7 जून रोजी नामंजूर केला. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंसह गटनेता मुन्ना तेली यांच्यासह 29 नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.