घरकुल घोटाळा प्रकरण; 30 डिसेंबरला होणार सुनावणी
जळगाव– तत्कालीन जळगाव नपाच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या महापालिकेच्या पाचही विद्यमान नगरसेवकांना आयुक्तांनी अपात्र का करण्यात येऊ नये ? यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी 17 डिसेंबर रोजी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मंगळवारी या नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्याने त्यांना दि.30 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
दीपक गुप्ता यांनी अपात्रेची केली मागणी
घरकुल घोटाळ्यात 31 आगस्ट रोजी धुळे विशेष न्यायालयाने जळगाव नगरपालिकेतील तत्कालीन व विद्यमान 48 जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. यातील सर्वच आरोपी जामीनावर मुक्त झाले आहेत. शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिलेली नसल्याने विद्यमान नगरसेवक तथा भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे व स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी पालिकेचे आयुक्तांपासून राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत केली आहे. दि.3 डिसेंबर रोजी पाचही विद्यमान नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यात घरकुल घोटाळ्यात दोषी ठरल्याने आपणास अपात्र का करण्यात येऊ नये यावर उपस्थित राहून बाजू मांडर्याच्या सूचना नोटीसीद्वारे करण्यात आल्या होत्या.
या कारणामुळे दिली मुदतवाढ
आज सकाळी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या दालनात यावर सुनावणी होणार होती. आयुक्त टेकाळे यांच्यासह महापालिकेचे प्रमुख विधी सल्लागार अड.आनंद मुजुमदार उपस्थित होते. यावेळी भाजपाचे गटनेते भगत बालाणी, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी व सदाशिवराव ढेकळे यांनी हजेरी दिली. यावेळी सोनवणे यांनी मुलाच्या लग्नासाठी, भगत बालाणी यांनी त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचे कारण देत, दत्तात्रय कोळी यांनी आजार तर सदाशिव ढेकळे यांनी कुटुंबातील लग्नकार्यासाठी आयुक्तांकडे खुलासा सादर करण्यास मुदत मागितली. दरम्यान नगरसेविका लता भोईटे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे उपस्थित राहील्या नाहीत त्यांच्यातर्फे प्रतिनिधी निलेश पाठक यांनी मुदत मागून घेतली.त्यानुसार आयुक्तांनी पाचही नगरसेवकांना अपात्र का करु नये ? यावर म्हणणे मांडण्यासाठी 30 डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे.