अपात्रप्रकरणी सभापतींचा शासनाकडे अपील दाखल

0

यावल। येथील पंचायत समिती सभापती संध्या महाजन यांना पक्षादेश (व्हीप) झुगारल्या प्रकरणी जिल्हाधिकारींनी अपात्र ठरवले होते. तेव्हा जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाविरुध्द राज्य शासनाकडे संध्या महाजन यांनी अपील दाखल केले आहे. अपीलाअंती काय निर्णय होणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपाचा व्हिप झुगारुन केले होते बंड
येथील पंचायत समितीच्या दहापैकी पाच जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने जिंकून काठावरील बहुमत गाठले होते. तर यात अपक्ष पल्लवी पुरूजित चौधरी यांची साथ घेवुन पुर्ण बहुमत मिळवत सत्तास्थापन करीत प्रथम संधी पल्लवी चौधरींना देण्याचा भाजपचा निर्णय संध्या महाजन यांनी झुगारत बंड पुकारले होते व त्यांना काँग्रेसने समर्थन देत दोन्ही बाजुने पाच – पाच सदस्य होत समसमान मते झाली होती.

तसेच 14 मार्च रोजी इश्वर चिठ्ठीव्दारे संध्या महाजन यांनी बाजी मारत सभापतीपदावर विराजमान झाल्या होत्या तेव्हा पंचायत समिती भाजप गटाचे गटनेता दिपक पाटील यांनी संध्या किशोर महाजन यांनी व्हीप झुगारत गटाने दिलेल्या उमेदवारास मतदान न केल्याने त्यांच्या विरूध्द अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या कडे सादर केला होता व 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांनी संध्या महाजन यांना अपात्र ठरवले होते तेव्हा जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाविरूध्द संध्या महाजन यांनी आता राज्य शासनाकडे ग्रामिण विकास मंत्रालयात अपील दाखल केले आहे तेव्हा या अपीलात महाजन यांना दिलासा मिळेल काय? याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.