अपुरा पाऊस असणार्‍या जिल्ह्यांमध्ये कृषीपंपांना बारा तास वीज पुरवठा

0

मुंबई । राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याची शक्यता लक्षात घेता कृषीपंपांना सध्याच्या 8 तासांऐवजी 10 ते 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी आहे. या मागणीनुसार कार्यवाहीसाठी संबंधित जिल्ह्यांत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. शासनाच्या या निर्णयामुळे पिकांना जीवदान मिळणार असून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

समितीत अधिकार्‍यांचाही समावेश
राज्यात यंदा पावसाळा सुरु झाल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि महावितरणचे संबंधीत अधीक्षक अभियंता यांचा समावेश असेल. या समितीच्या निर्देशानुसार महावितरणतर्फे कृषीपंपांसाठी जादा वीज पुरवठा करण्यात येईल.

प्रस्ताव देणार
नाशिक, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, उस्मानाबाद, भंडारा, धुळे या जिल्ह्यांतील 19 तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे कृषीपंपांना 12 तास वीज पुरवठा करण्याची गरज असल्याचे आढळून आले आहे. याबाबत आज सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ज्या तालुक्यांमध्ये 25 टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पावसाचा खंड 4 आठवड्यापेक्षा अधिक असणार्‍या तालुक्यांमध्ये 8 ऐवजी 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा. हा पुरवठा करताना अधिक उपशामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, जमिनीतील पाण्याचा स्तर अधिक खाली जाऊ नये याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती पर्जन्यमान, पीक परिस्थिती व कृषी विभागाचे अभिप्राय लक्षात घेऊन शासनाच्या निकषानुसार कृषीपंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे आदेश महावितरणला देईल. तसेच अतिरिक्त वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळावी म्हणून महावितरण वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करेल.