अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील नवीन जमीन खरेदी-विक्री करणे तसेच इमारती मालमत्तांचे दस्त नोंदणीसाठी एकमेव स.दु.नि.कार्यालय अंबरनाथ तहसीलदार इमारतीच्या कार्यालयात आहे. परंतु सदर सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या वर्षभरापासून कर्मचार्यांची कमतरता असल्याने नोंदणीचे कामकाज कासवगतीने होते. त्यातच या ठिकाणी संगणकचालक हे खाजगी असल्याने त्यांना देखील बंदी घातल्याने हे सुद्धा काम अडचणीत आले आहे. त्यात कार्यालयात चार प्रमुख पदे, दुय्यम निबंधक आणि वरिष्ठ लिपीकांची दोन पदे अजूनही रिक्त आहेत.
अंबरनाथ शहरातील सर्व मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी, जागेच्या खरेदीविक्रीची नोंदणी आणि करारनामे यांची नोंदणी हे दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते. दररोज 7 ते 8 दस्तावेज नवीन नोंदणीसाठी नागरिक या ठिकाणी येत असतात. मात्र या कार्यालयात चार प्रमुख पदे, दुय्यम निबंधक आणि वरिष्ठ लिपीकाचे दोन पदे अजुनही रिक्त आहेत. तर या कार्यालयातील शिपाई गेल्या तीन महिन्यांपासून सुट्टीवर आहेत. त्यामुळे या कार्यालयामधील अन्य कर्मचार्यांवर कामाचा ताण पडला आहे. सोबत या कार्यालयात संगणकावर काम करण्यासाठी ज्या संगणक चालकांची गरज आहे. ती गरज देखील भागविणे शक्य होत नाही. संगणकावर स्कॅनिंगचे काम करण्यासाठी बी.ओ.टी.नुसार दिलेल्या कामाची मुदत संपल्याने आता या कार्यालयात खाजगी संगणक चालकांकडून काम केले जात आहे. यावर आक्षेप घेत सह. जिल्हा निबंधकांनी लेखी आदेश देऊन खाजगी संगणकचालकांचा वापर करू नये असे स्पष्ट केले आहे.
या संदर्भात सह जिल्हा निबंधक दिपक पाटील म्हणाले की कार्यालयातील कर्मचार्यांची कमतरतेबाबत वरिष्ठांना कल्पना दिली आहे. रिक्त पदे लवकरच भरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आणि संगणक चालक प्रकरणी त्वरित निर्णय घेतला जाणार आहे.