अपुर्‍या संख्येवर परिक्षण करून तोडगा काढू : चन्ने

0

परिवहन आयुक्तांनी दिली माहिती

मोशी : पिंपरी-चिंचवड आणि पुणेे परिवहन कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या अपुरी पडते आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढणारी संख्या पाहता कर्मचारी कमी पडत आहेत. परंतु शासनातर्फे जेवढी पदे मंजुर करण्यात आली आहेत, तितकी पदे भरली आहेत. मात्र आता असणार्‍या कर्मचार्‍यांवर पडणारा बोजा पाहता त्यावर परिक्षण करून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली. आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुणे दौर्‍यावर असलेल्या चन्ने यांच्या हस्ते मोशी, प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

परिवहन आयुक्त पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रकाश चन्ने हे पहिल्यांदाच पुणे दौर्‍यावर आलेले आहेत. वृक्षारोपणानंतर त्यांनी आरटीओ कार्यालय इमारत, तसेच विविध विभाग, ब्रेक टेस्टींग ट्रॅक यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयीन कर्मचार्‍यांशी संवाद साधला. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, संजय राऊत, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यालयाच्या पार्किंगसाठी जागा मिळणार
शेखर चन्ने पुढे म्हणाले की, राज्यात अजुन 5-6 परिवहन कार्यालयाच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाला भेडसावत असलेल्या पार्कींगच्या जागेबाबत प्राधिकरणाशी बोलणे झाले आहे. त्यांच्याकडून पार्कींगसाठी आवश्यक आरटीओ कार्यालयासमोरील सुमारे पाच-सहा एकर जागा लवकरच घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कार्यालयातील लिफ्टचीही सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक निधी शासनातर्फे दिला जाणार आहे.