अपूर्ण शौचालायांवरून शहाद्यात जिल्हाधिकार्‍यांनी घेतले फैलावर!

0

शहादा । स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकामाचे उद्दिष्ट जूनअखेर पूर्ण करणे पालिका प्रशासनाला बंधनकारक आहे.  अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देत ज्या लाभार्थ्यांनी दुसरा हप्ता घेऊन देखील शौचालयांचे बांधकाम अपुरे ठेवले आहे, त्यांच्यावर तात्काळ  कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शहाद्यात पहिल्या आढावा बैठकीत दिले आहेत. शहादा पालिकेच्या सभागृहात डॉ. कलशेट्टी यांनी  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीस नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,  जिल्हा नियोजन  अधिकारी शांताराम गोसावी, तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ.  उल्हास  देवरे हे उपस्थित  होते. शहादा शहर व सुंदर करण्यासाठी पालिकेला दोन हजार 631 वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या पैकी दोन हजार 332 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत  बोलताना डॉ .कलशेट्टी म्हणाले, जून अखेर शौचालयाचे बांधकाम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण  झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.