सिंहगड रोड : येथील स्प्रिंगडेल विद्यालयाची विद्यार्थिनी अपूर्वा कदम व वैष्णवी शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना हरवत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करत नाव गाजविले आहे.
अपूर्वा कदम व वैष्णवी शिंदे यांची थ्रो बॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवण्यात आलेल्या थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या दोघींनी 17 जूनमध्ये नेपाळ येथे झालेल्या जागतिक थ्रो बॉल स्पर्धेत आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 15-9; 15-13, या फरकाने हरवून आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्ज्वल केले आहे.
मुलीने आमचे नाव तर कमावले त्याचबरोबर पाकिस्तानला हरवून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव चषकावर कोरले त्याबद्दल आम्हाला तिचा अभिमान असल्याचे आई वैशाली कदम यांनी सांगितले. या दोन्ही विद्यार्थिनींवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणार आहे. तिचे मार्गदर्शक गुरू भारतीय टीमचे प्रशिक्षक जयदीप तांबवेकर हे होते. या खेळासाठी पुणे जिल्हा क्रीडा विभागाने सहकार्य करावे असे तिला प्रोस्हान देणार्या क्रिडा रसिकांचे म्हणणे आहे.