मुंबई-अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा २ हजार ९८८ मतांनी पराभव केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून डावखरेंनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावखरेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती.
ऐनवेळी पक्षात आलेल्या डावखरेंना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये थोडीसी नाराजी दिसून आली होती. पण भाजपाच्या निकालावर याचा परिणाम झाला नाही. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. कोणत्याही परिस्थितीत डावखरेंचा पराभव करण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता. परंतु, त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
मतमोजणीच्या सुरूवातीला संजय मोरे हे २००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. मात्र, तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी होते. पहिल्या फेरीत डावखरे हे आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत डाखरेंना १०,३०४ मोरेंना ९,४९४ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीनंतर डावखरे यांना ११,१८० आणि मोरे यांना ८,९९७ मते मिळाली होती.
तिसऱ्या फेरीत डावखरेंनी निर्णायक आघाडी घेतली. या फेरीत त्यांना २८,९४५ तर मोरेंना २३,२११ मते मिळाली. या फेरीत डावखरे हे ५,७३४ मतांनी आघाडीवर होते. मात्र कोटा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेली मते न मिळाल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत सुमारे अडीच हजाराहून अधिक मते अवैध ठरली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ७३.८९ टक्के इतके मतदान झाले होते.