जळगाव । महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या चारही सभापतींची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड शक्रवारी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जाहीर केली. प्रभाग समिती क्र 1 साठी राष्ट्रवादी काँगे्रसचे रविंद्र मोरे, प्रभाग समिती क्र. 2 साठी खाविआचे चेतन शिरसाळे, प्रभाग समिती क्र. 3 साठी खाविआच्या संगिता राणे तर प्रभाग समिती क्र. 4 साठी मनसेचे संतोष पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. प्रभाग समिती क्र. 1 ची निवडणूक प्रक्रीया सकाळी 11 वाजता महानगर पालिकेच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे, प्रभारी नगरसचिव डी. आर. पाटील उपस्थित होते. पिठासीन अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी माघारीसाठी 15 मिनीटांचा कालवधी दिला होता. निर्धारीत 15 मिनीटांनी माघारी न घेतल्याने रविंद्र मोरे यांची बिनविरोध निवड किशोर राजे निंबाळकर यांनी जाहीर केली.
भाजपा सदस्यांनी लावली हजेरी
प्रभाग क्र. 2 ची निवडणूक प्रक्रीया करण्यात घेण्यात आली. याप्रभागासाठी खाविआचे चेतन शिरसाळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच प्रभाग क्र. 3ची सभापती निवड प्रक्रीयेची सुरूवात करण्यात आली असता खाविआच्या संगिता राणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. तसेच प्रभाग समिती क्र. 4च्या सभापतीपदी मनसेचे संतोष पाटील यांची बिनविरोध निवड पीठासन अधिकार्यांनी केली. दरम्यान, निवडणूक प्रक्रीयेप्रसंगी उपमहापौर ललित कोल्हे, सभागृह नेते रमेश जैन, श्यामकांत सोनवणे, विरोधी पक्ष नेते वामनदादा खडके, पृथ्वीराज सोनवणे आदी उपस्थित होते. दरम्यान, सभापतीपदी निवड झाल्यानंतर सभागृहा बाहेर फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
सभापतीपद केवळ शोभेपुरते
मागील प्रभाग समिती सभापतींनी त्यांच्या एक वर्षांच्या कार्यकाळात एकही सभा घेतली नाही. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने प्रभाग समिती सभापतींना कोणत्याही स्वरुपाचे काम करता येत नाही. यामुळे हे पद शोभे पुरतेच उरले आहे. प्रभाग समिती सभापतींना त्यांच्या प्रभागात किरकोळ दुरूस्ती करण्याचा अधिकार आहे. मात्र महानगरपालिकेवर हुडकोचे कर्ज असल्याने या कर्जफेडीतच मनपाला मोठा निधी द्यावा लागत आहे. यामुळे शहरातील किरकोळ दुरूस्तीची कामेही होऊ शकत नाही यातच प्रभाग समिती सभापतींना अधिकार असले तरी निधी नसल्याने कोणत्याही स्वरुपाचे काम करता येत नसल्याने मागील सभापतींनी एकही सभा घेतली नसल्याचे दिसून येत आहे. सभापतीपद मिळाल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा वाढत असल्या तरी निधीअभावी या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही.