अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या प्रश्‍नोत्तराने कर्मचार्‍यांची उडाली भंबेरी

0

चित्त स्थिर न ठेवणार्‍या शिक्षकासह पाटबंधारे कर्मचार्‍यास नोटीस

भुसावळ- अपर जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रशिक्षण सुरू असताना चित्त स्थिर न ठेवता व विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे न देणार्‍या शिक्षकासह पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यास प्रशासनाने नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. रावेर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी पांडुरंग टॉकीजमध्ये 700 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची विशेष उपस्थिती होती. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यासह विविध बाबींविषयी गाडीलकर हे कर्मचार्‍यांना सूचना देवून त्याबाबत कर्मचार्‍यांचा रीव्ह्यू घेताना दोन कर्मचार्‍यांचे लक्ष नसल्याचे लक्षात आल्यानंतर व त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना तातडीने नोटीस बजावण्यात आली. नोटीसीनंतर समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

700 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण
रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळात टॉकीजमध्ये 700 कर्मचार्‍यांना प्रोजेक्टरद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार महेद्र पवार, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात अर्ज भरण्यासह पाकिटे बंद करणे तसेच मशीन सिलिंग करणे तसेच दुपारच्या दुसर्‍या सत्रात जामनेर रोडवरील मुन्सीपल हायस्कूलमध्ये 14 वर्गामध्ये कर्मचार्‍यांना व्हीव्हीपॅट मशीन मतदान यंत्रांना कसे जोडायचे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दरम्यान, सोमवारी सुध्दा 450 कर्मचार्‍यांना रविवारप्रमाणेच प्रशिक्षण दिले जाणार आहे.