भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी व्यक्त केला संताप : पार्सल व्हॅन शंटींग करताना दुर्घटना
भुसावळ- अप 12142 पाटलीपूत्र-एलटीटी एक्स्प्रेसला लावलेले पार्सल व्हॅन काढल्यानंतर पुन्हा मूळ बोग्यांना इंजिन लावले जात असताना इंजिन रेल्वे रूळाखाली घसरल्याची घटना रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लोखंडी पुलावर (होम सिग्नलजवळ) शनिवारी सकाळी 8.40 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे अप रेल्वे लाईनवरील तब्बल चार प्रवासी गाडी खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आधीच अप पाटलीपूत्र गाडी 40 मिनिटे उशिराने दाखल झाली असताना रेल्वे इंजिन रूळाखाली उतरल्याने प्रवाशांचा संताप अनावर होवून त्यांनी घोषणाबाजी करीत तातडीने गाडी मार्गस्थ करण्याची मागणी केली तर या प्रकारामुळे अप मार्गावरील पुष्पक, भागलपूर व ताप्तीगंगा या तीन गाड्यात तब्बल दोन तास उशिराने धावल्या तर दुपारी 12.47 वाजता रेल्वे रूळाखाली उतरलेले इंजिन पुन्हा रूळावर घेण्यास यंत्रणेला यश आल्यानंतर दुपारी 12.55 वाजता अप पाटलीपूत्र एक्स्प्रेस मुंबईकडे तब्बल पाच तास दहा मिनिटे उशिराने रवाना झाली.
होम सिग्नलजवळ इंजिन रूळाखाली उतरले
भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक एकवर शनिवारी सकाळी 8.40 वाजेच्या सुमारास अप 12142 पाटलीपूत्र-एलटीटी एक्स्प्रेस दाखल झाली. आधीच 40 मिनिटे उशीरा दाखल झालेल्या या गाडीच्या इंजिन (क्रमांक व्हीएपी-4-22885) पार्सल व्हॅन (क्रमांक 10828) लावले असताना ते बाजूला काढून इंजिन पुन्हा मूळ बोग्यांना लावण्याची प्रक्रिया सुरू असतानाच खांबा क्रमांक 443/26 जवळ इंजिनाची चाके रूळाखाली घसरली. या प्रकाराची माहिती कळताच हुटर वाजवून रेल्वे प्रशासनाने ईशारा दिला तर घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे एडीआरएम मनोज सिन्हा, सिनी.डीएसओ.के.एस.सयाली, सिनी.डीईएन.दीपक कुमार, सिनी.डीएसटीई. निशीकांत द्विवेदी, सिनी.डीईई.सी.आर.टी.ओक, सिनी.डीटीआरओ.पी.पी.भंज, स्टेशन संचालक जी.आर.अय्यर, तोमर सिंग यांच्यासह तांत्रिक विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी तसेच लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरे, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक लवकुश वर्मा, जे.एल.शहा, आर.एम.गालफाडे, दीपक शिरसाठ, शेख नावेद आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 8.40 वाजता घटना घडल्यानंतर दुपारी 12.47 वाजेच्या सुमारास यंत्रणेला रूळाखाली उतरलेली इंजिनाची चाके पुन्हा रूळावर आणण्यात यश आले तर हे इंजिन बाजूला केल्यानंतर अन्य दुसरे इंजिन लावून गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली.
चार प्रवासी गाड्या खोळंबल्या : प्रवासी संतप्त
अप लाईनवर इंजिन रेल्वे रूळाखाली उतरल्याने प्लॅटफार्म क्रमांक एकवरून धावणार्या अप 12533 पुष्पक, अप 12335 भागलपूर व अप 19046 वाराणसी-सुरत (ताप्तीगंगा) एक्स्प्रेसचा दोन तासांपेक्षा अधिक खोळंबा झाल्याने प्रवासी अधिकच संतप्त झाले तर अप पाटलीपूत्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच रूळावर येत संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली. तातडीने गाडी मुंबईकडे रवाना करण्यासाठी प्रवाशांनी जोरदार आग्रहही धरला.