अफगाण-भारत मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याने राज्यपालाकडून समाधान

0

मुंबई । अफगाणिस्तान आणि भारत या देशांमधील संबंधांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. हजारो वर्षांपासून उभय देशांमध्ये तसेच लोकांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होत आहे. अलिकडच्या काळात भारत अफगाणिस्तानला माहिती तंत्रज्ञान, कॉम्पुटर विज्ञान, रस्ते बांधणी, ऊर्जा संचरण, या क्षेत्रात सहकार्य करीत असून उभय देशांमधील राजकीय – आर्थिक संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरु झाल्याबद्दल अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी समाधान व्यक्त केले.

सहकार्य वाढवणार
अफगाणिस्तान भारताशी आर्थिक, व्यावसायिक, राजकीय, सामरिक, सुरक्षाविषयक, सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी उत्सुक असून चाबहार बंदरामुळे व्यापाराला आणखी चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अफगाणिस्तानातील 5000 विद्यार्थी भारतीय शिष्यवृत्तीवर महाराष्ट्रात शिक्षण घेत असून एकट्या पुणे येथे 3500 अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगत भारताने विद्यार्थी शिष्यवृत्तींची संख्या अधिक वाढवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इतिहासावर एक चित्रपट
अफगाणिस्तान भारतासह विविध शहरांमध्ये आगामी काळात संयुक्त सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारत तसेच अफगाणिस्तानातील चित्रपट निर्मातेदेखील उभय देशांच्या इतिहासावर आधारित एक चित्रपट निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने अफगाणिस्तानला काबुल येथे संसद भवनाची इमारत तसेच सलमा धरणाच्या रूपाने भारत-अफगाण मैत्री धरण बांधून दिल्याबद्दल त्यांनी भारताप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.