अफवांचे तंत्र व मंत्र ….

0

ज्याला कुणाला सुचणे जमले त्याने त्याचा इतिहासात खूप चांगला वापर करून घेतला. हिटलरच्या सोबत असणारा गोबेल्स याने या तंत्राचा पुरेपूर आणि समर्पक वापर करून इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण केले. तिला आज गोबेल्सनीती म्हणून जगात राजमान्यता मिळाली आहे. गोबेल्सनीतीला देश, भाषा, भोगौलिक सीमा, खंड, संस्कृती याच्याही पलीकडे जाऊन पोहोचली आहे. हिटलरच्या अस्ताबरोबर ही गोबेल्सनीती तिथेच थांबली असती तर ठीकच होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. आज जगभर मान्यता पावलेल्या गोबेल्स नीतीचा वारसा पुढे नेणारे खूप महनीय लोक सातत्याने कार्यरत आहेत. अलीकडच्या दशकात सामाजिक माध्यमांचा झपाट्याने झालेला विकास आणि तंत्रज्ञांचा नवनवीन आविष्कार यामुळे तर त्यात अधिकच प्रगती झाली.

पुराण काळाचा संदर्भ पाहता जळी, स्थळी, काष्ठी,पाषाणी अगदी पृथ्वीतळापासून संपूर्ण ब्रह्मांडात सर्वत्र संचार करणार्‍या नारदाचा वारसा चालवणारे आधुनिक नारद असा भारतात ज्यांचा उल्लेख होतो, अशा मित्रांमुळे जागतिक स्तरावरदेखील या तंत्राने आपली उपस्थिती नोंदवली. आता फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, व्टिटर, ब्लॉग आदी साधनांचा वापर करत ज्याला हे तंत्र हाताळता येते, असे सारे यात आपले विचार मांडण्यात पुढे सरसावले. गांडुळाचा साप करणारे आणि नंतर त्याला अजगर म्हणून सावज देऊन त्याला सुस्त करणारे आणि त्याच्या उपद्व्यापाने ठार होणारे निष्पापदेखील आपण पाहत आलो आहोत. आज सामाजिक माध्यमात कॉपी पेस्ट करणारे इथपर्यंत न थांबता ते त्याला अवांतर शब्द जोडून त्यातल्या मजकुराची शहानिशा न करता पुढे पाठवला जातो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह व्टिटर, ब्लॉग आदी माध्यमातून तर कित्येक सेलिब्रेटीजना एक दिवसआड मृत्यू देऊन पुन्हा अमरत्वाचा अभिशाप दिला जातो. उदाहरणार्थकालपर्यंत अमिताभ बच्चन यांचे निधन, ऐश्‍वर्या रॉयचा आत्महत्येचा प्रयत्न, शाहरुखचा विमान अपघात, रात्री केस कापणे आता होणार जाचक, सदर 88888…नंबरवरील फोन उचलू नका बॉम्बस्फोट होईल, मीठ आता नाही तर कधीच नाही आजच खरेदी करा…अशा कित्येक अफवा भ्रमंती सदृश सामाजिक माध्यमात वावरताना पाहतो.

खरेतर अफवांना चेहरा नसतो तो चेहरा कधी हसरा, तर कधी रडवणारा असतो, अशा अनेक अफवांना किती तरी लोक बळी पडून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या अफवांच्या तंत्राचा दुरुपयोग करताना इतरांच्या आयुष्याशी सातत्याने खेळत राहण्यास अनेक लोक धन्यता मानतात. विद्यार्थी व कॉलेजला जाणारे तरुण मंडळी सर्रास सामाजिक माध्यमावर रात्रंदिवस चटपटीत किस्से रंगवण्यात व्यस्त असतात. तेव्हा आपण अगदी ताकदेखील फुंकून फुंकून घेतले पाहिजे, अशा अफवांच्या तंत्र-मंत्रातून युवाच नव्हे, तर सामाजिक माध्यम हाताळणारे ज्येष्ठदेखील यातून सुटलेले नाहीत हेच खरे…

– संदीप केदार , जळगाव
8600070099