अफवांवर विश्‍वास ठेवू नका वरणगाव व बोदवड पोलिसांचे आवाहन

0

अफवा पसरणार्‍यांवर होणार गुन्हे दाखल : अनोळखी दिसल्यास संपर्क साधा

भुसावळ- बोदवड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी व्हाट्सअप किंवा फेसबुकवरील कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन वरणगाव व बोदवड पोलिसांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या किंवा शेजारील जिल्ह्यात, राज्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबत समाजकंटकाकडून अफवा पसरवली जात आहे. काही ठिकाणी कोणतीही शहानिशा न करता निरपराध इसमावर हल्ले होऊन वाहनांची जाळपोळ, मारहाण करून लोकांना मारून टाकण्यापर्यंतच्या गंभीर घटना घडल्या आहेत. नंतर अशा घटनांमध्ये सदर इसम निरपराध, काही कामानिमित्त त्या भागात आलेले निष्पन्न होऊन हल्लेखोर इसमावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे वरणगाव व बोदवड शहर व ग्रामीण भागातील जनतेला पोलिसांनी आवाहन केले आहे.

अफवा पसरवणारे आता पोलिसांच्या रडारवर
मुले पळवणारी कुठलीही टोळी कार्यरत नसून लहान मुले पळविण्याची एकही घटना आपल्या परीसरात घडलेली नाही किंवा पोलिसांत तशी नोंद नाही. अशा प्रकारच्या अफवा समाजातील काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. यामुळे जनतेने अशा अफवांना बळी न पडता सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. शंका आल्यास कायदा हातात न घेता त्वरित संबंधित पोलीस स्टेशन, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठीत व सुजाण नागरीकांना सूचित करावे तर अशा अफवांचा संदेश पाठवणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे वरणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी व बोदवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी कळवले आहे.