अफवा पसरत असल्याने जम्मूतील इंटरनेट व मोबाइल सेवा पुन्हा बंद !

0

श्रीनगर: जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेला स्वतंत्र राज्याचा दर्जा कलम ३७० रद्द करून काढण्यात आला आहे. या प्रक्रियेवेळी जम्मू-काश्मिरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता हळूहळू सेवा सुरु करण्यात येत आहे. मात्र आज रविवारी पुन्हा जम्मूमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. काल शनिवारीच या सेवा सुरू करण्यात आल्या होत्या.

जवळपास पंधवरवाड्यानंतर शुक्रवारी आणि शनिवार दरम्यान रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी जिल्ह्यांमध्ये कमी गतीची मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. कलम ३७० हटविण्यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. शिवाय या निर्णया अगोदर राज्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती. यानंतर दोन दिवस अगोदरच जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आल्यानंतर येथील पोलिस महानिरिक्षक मुकेश सिंह यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.