अफवेमुळे चोर समजून तिघांची दगडाने ठेचून हत्या

0

पालघर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यबंकेश्‍वरकडे जाणार्‍या तिन प्रवाशांची दराडेखोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत दगडाने ठेचून ठार मारल्याची खळबळजनक घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गुरुवारी रात्री घडली. रात्रीच्यावेळी तीन ते चार चोर फिरत असल्याची अफवा पसरल्याने तीनजणांचा हकनाक बळी गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करत दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री पालघर जिल्ह्यातील एका गावात चोर घुसल्याची अफवा पसरली होती याचवेळी दाभाडी-खानवेल मार्गावरून तीनजण मारुती इको गाडीतून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही गाडी थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने गाडीतील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देत त्यांना दगडाने ठेचून मारले. यावेळी या तिघांनी जीव वाचवण्यासाठी गयावया करत पळण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ग्रामस्थांनी काहीही न ऐकता या तिघांनाही जीव जाईपर्यंत मारले.