वाराणसी : बनारसमधील काशी हिंदू विश्वविद्यालयात विद्यार्थीनींची छेडछाड केल्याने दोन दिवसांपासून वातावरण तणापूर्ण होते. त्यातच शनिवारी रात्री संतप्त विद्यार्थी छेडछाडीचा निषेध करण्यासाठी जमले असता सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला. यामध्ये काही विद्यार्थीनी जखमी झाल्या आहेत. घटनेत जाळपोळीचे प्रकारही घडले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 25 पोलिस ठाण्यांतील पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, अश्रुधुराची नळकांडीही फोडली. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आली. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधानांच्या दौर्याला विरोध केल्याचा विद्यार्थ्यांवर आरोप
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहेत की, पोलिसांनी अगोदर लाठीमार केला त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. हे सर्व विद्यार्थी दोन दिवसांपूर्वी विद्यार्थीनींच्या झालेल्या छेडछाडीचा निषेध करण्यासाठी एकत्र आले होते. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी दिले असून पोलिस आयुक्तांकडे सर्व घटनाक्रमाचा अहवाल त्यांनी मागितला आहे. तर दुसरीकडे विश्वविद्यालयाचे कुलगुरू गिरीशचंद्र त्रिपाठी यांनी या प्रकाराला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्रिपाठी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याला विरोध करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांच्यासोबत काही बाहेरचे लोकही होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीवरून सुरक्षेसंबंधी कार्यवाही करणार असल्याचेही सांगितले.
वसतिगृहे खाली करण्याचे आदेश
विद्यार्थ्यांवरील या हल्ल्यानंतर काशी हिंदू विश्वविद्यालयातील वातावरण तणावपूर्ण असून सर्वत्र स्मशानशांतता आहे. काही विद्यार्थीनींनी या प्रकारानंतर भयभीत होऊन आपले घर गाठले आहे. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने महिला महाविद्यालय वसतीगृह, बिर्ला विद्यार्थी वसतीगृह, मोनादेवी, राजराम, लालबहादुर शास्त्री, नरेंद्र देवी आदी वसतीगृहे खाली करण्याचे निर्देश दिल्याने संतापात भर पडली आहे.
2 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ बंद
विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी राजेश सिंह यांनी सांगितले की, कुलगुरूंनी सध्याच्या परिस्थितीचा विचार करून विश्वविद्यालय 2 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घटनेच्या चौकशीसाठी एका समितीचीही स्थापना केली आहे. बाहेरील काही लोक येथील विद्यार्थ्यांना हाताशी धरून संस्थेचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या विश्वविद्यालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काही विद्यार्थी वसतीगृहे रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सिंह म्हणाले.
घटनेचा सर्वस्तरातून निषेध
वाराणसीच्या हिंदू विश्वविद्यालयात घडलेल्या या प्रकारानंतर योगी आदित्यनाथ सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. याविरोधात हजरगंज येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आदींनी या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. हिंसाचारात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे म्हटले आहे.