अबब…घरगुती वीज ग्राहकाला महिन्याचे एक कोटी 61 लाख रुपये वीज बिल

0

पिंपरी चिंचवड ः महावितरण कंपनीने सामान्य नागरिकांना जबरदस्त शॉक दिला आहे. घरगुती ग्राहकाला महिन्यात तब्बल 1 कोटी 61 लाख बिल म्हणजे अनिल अंबानी पेक्षा जास्त बिल आलेला श्रीमंत ग्राहक महावितरण कंपनीने रूपीनगर प्रभागात शोधून काढला आहे. शिल्पा मल्लिकार्जुन सातपुते ह्या ग्राहकाला प्राधिकरण सबडिव्हिजन अंतर्गत रूपीनगरमध्ये हे बिल आले आहे. शहरात महा वितरण कंपनीचा गलथान कारभार यातून चव्हाट्यावर आल्याचे दिसून येते.

घरगुती वीज ग्राहकाला महिन्याचे एक कोटी 61 लाख रुपये वीज बिल आल्याने परिसरात चांगलीच चर्चा सूरू आहे. तर, काही ठिकाणी महावितरणच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदविण्यात येत आहे. यासंदर्भात संबधित रिडींग घेणार ठेकेदार त्याचबरोबर संबंधित अधिकारी यांना जुलै महिन्यात शिवसेना, युवासेना रूपीनगरमार्फत निवेदन देण्यात आले होते. तरी देखील कुठलीही कार्यवाही झालेली नाही. इतकेच नव्हे तर वेळेवर रिडींग न घेता डायरेक्ट वीज बिल देण्यात येते. हे बिल सुद्धा शेवटची दिनांक झाल्यावर पोहोच होते, ठेकेदार व अधिकारी ह्यांची यामध्ये मिलिभगत असून दोघां वरती कार्यवाही करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. तसेच, कार्यकारी अभियंता चौधरी यांना निलंबित करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात यईल, असा इशारा महावितरणला निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन प्रादेशिक संचालक सुनील पावडे यांना देण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा सनियंत्रण सदस्य संतोष सौंदणकर, शाखा प्रमुख नितीन बोडें, गणेश इंगवले, युवासेना चिटणीस अमित शिंदे, राहुल पिंगळे, संघटक किशोर शिंदे, अविनाश खडके, मल्लिकार्जुन सातपुते, राठोड तसेच पदाधिकारी उपस्थित होते.