पुणे । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त तब्बल 1 हजार 970 किलो मोदकाचा चॉकलेट केक साकारण्यात आला. या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. नर्हेमधील द केक हाउसच्या 16 जणांनी अवघ्या 8 तासांत हा विक्रम केला आहे.
सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात हा विक्रम करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे ऑफिशियल अॅडज्युडिकेटर स्वप्निल डांगरीकर, केक साकारणारे मार्गदर्शक धर्मनाथ गायकवाड, अक्षय मोरे आदी उपस्थित होते.
डांगरीकर म्हणाले, पुण्यामध्ये साकारलेल्या या मोदकाच्या केकचा विक्रम झाला असून हा नवा विक्रम आहे. यापूर्वी 2009मध्ये 1 हजार 41 किलोचा केक स्पेनमध्ये साकारण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न झाला नाही. बुधवारी (दि.23) दुपारी सुरू झालेली केक तयार करण्याची प्रक्रिया रात्री 11.30 वाजता संपली. त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले असून संकेतस्थळावर लवकरच नोंद होईल.
धर्मनाथ गायकवाड म्हणाले, केक करण्याकरीता 1 हजार किलो तयार केक पावडर, 1 हजार 100 किलो चॉकलेट ट्रफल आणि 50 लीटर क्रिम लागले आहे. केकचा आकार 23 बाय 35 फूट असून याकरीता 3 दिवसांपासून तयारी सुरू होती. याकरिता विविध केक सप्लायर्सनी देखील सहकार्य केले आहे. अशोक गोडसे म्हणाले, शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम सुरू असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मोदकाच्या केकचा हा प्रसाद सणस मैदानावर महापालिकेच्या वतीने आयोजित गणेश मूर्ती बनविणे स्पर्धेतील चिमुकल्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.