मुंबई । येथील 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा पॅरोल नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी फेटाळला आहे. लग्नासाठी त्याने 45 दिवसांची रजा मागितली होती. सालेम याने 16 फेब्रुवारीला नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. मुंबई विशेष विवाह कायद्यानुसार सयैद बहार कौसर उर्फ हिना हिच्याशी निकाह करण्यासाठी पॅरोल मिळावा, असे सालेम याने आपल्या अर्जात म्हटले होते.
दरम्यान, सालेम हा 12 वर्षे, 3 महिने आणि 14 दिवसांपासून तुरुंगात आहे. या काळात त्याने एक दिवसही सुटी घेतलेली नाही. तुरुंगातील सालेमची वर्तवणूक पाहाता त्याचा अर्ज 27 मार्च रोजी कोकण विभागीय आयुक्ताकडे पाठवण्यात आला होता. अहवाल तपासल्यानंतर सालेमचा अर्ज 5 एप्रिलला ठाण्याच्या पोलिस आयुक्तांंकडे सादर करण्यात आला होता. पुढील चौकशीसाठी अर्ज मुंबईतील मुंब्रा पोलिस स्टेशनला पाठवण्यात आला होता.