अब्दुल गनी खान टोळीवर मोक्का

0

पुणे । पुणे शहर आणि परिसरात गेल्या 10 वर्षापासून संघटीतपणे गुन्हे करणार्‍या खंडणी बहाद्दर नामचिन गुंड अब्दुल गनी खान टोळीच्या विरोधात मोक्कांतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी खडक पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार अक्रम नासीर पठाण (वय 27, रा. औंध), अब्दुल गनी खान, अक्षय राजेश नाईक (वय 28), अक्षय अंकुश माने (वय 23, तिघेही रा. घोरपडे पेठ) यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी चायनीज खाद्यपदार्थाची विक्री करणार्‍या नजमा इसाक शेख (वय 64, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या टोळीच्या विरोधात खंडणीचे सात ते आठ गुन्हे दाखल आहेत.

अब्दुल आणि त्याच्या साथीदारांनी चायनीजमध्ये विष कालविण्याची धमकी देत शेख यांच्याकडे दरमहा दोन हजार रुपयांची खंडणी मागितली होती. या टोळीने मेहबुब हुसेन अल्लाना या व्यावसायिकाच्या भावाचे अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 50 हजार रुपयांची खंडणी घेतली आहे. याव्यतिरीक्त या टोळीने मागील दहा वर्षांत संघटीतपणे अकरा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीच्या विरोधात मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.