मुंबई: कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी आज अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपात जाणार अशी चर्चा होती, अनेकद ते मुख्यमंत्री यांच्याशी संपर्कात होते. त्यानंतर औरंगाबादला महाजानादेश यात्रा आली तेंव्हा ते मुख्यमंत्र्यांसोबत महाजनादेश यात्रेत देखील सहभागी झाले होते. यावरून ते भाजपात जाणार असे निश्चित झाले होते. मात्र राजकीय सोयीनुसार त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार यांचा राजकीय दबदबा आहे. राज्यात कॉंग्रेसची परिस्थिती बिकट असताना त्यांनी जिल्हा परिषद, नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात ठेवले होते. सोयगाव-सिल्लोड मतदार संघातून ते आमदार झाले होते.