अब की बार …

0

भारतीय जनता पक्ष एक एक करून देशभरात एक एक राज्यांमधील विधानसभा निवडणुका जिंकत आहे. अटीतटीच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी करत राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आणले. मॅजिक फिगरच्या बेरजेच्या राजकारणात शतकी आकडा गाठण्याची किमया केवळ भाजपला साधता आली. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी दावा करताना एकंदरीत परिस्थितीचे आकलन करत पावले उचलली आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसनेही जेडीएसला पाठिंबा देत भाजपला सत्तासोपानपासून दूर ठेवण्यासाठी आपली खेळी खेळली आहे.

राज्यातील एकंदरीत त्रिशूंक परिस्थिती पाहता स्थिर सरकार कोण देऊ शकते, हे माहीत पडायला काही दिवस जावे लागणार आहेत. पण एकंदरीतच कर्नाटकमधील निवडणुकीच्या निकालाचा विचार केला, तर आगामी काळात काँग्रेसला अस्तित्वाची लढाई प्रत्येक निवडणुकीत लढावी लागणार आहे, हे निश्‍चित आहे. कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी दलित आमदाराला मुख्यमंत्री बनवण्याचे सूतोवाच केले. या निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी 2019 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान बनण्यास तयार असल्याचे जाहीर केले. पण एवढ्या खेळीनंतरही काँग्रेसला कर्नाटकचा किल्ला राखता आला नाही. कर्नाटकमध्ये फुललेल्या कमळामुळे काँग्रेस आता केवळ तीन राज्यांपुरता (पुड्डुचेरी, पंजाब आणि मिझोरम) मर्यादित राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान विजयाचे भाकीत वर्तवताना 15 मेनंतर काँग्रेस पीपीपी पक्ष म्हणून ओळखला जाईल, असे म्हटले होते. निकालानंतर पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस आता पंजाब, पुड्डुचेरी आणि परिवार काँग्रेसपुरता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका काँग्रेससाठी किती महत्त्वाच्या असणार आहेत याचा विचार त्यांना करावा लागणार आहे.

आगामी काळात कर्नाटकमध्ये सत्ता कोणालाही मिळो. पण या निवडणुकीतील काँग्रेसला आलेल्या अपयशामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांचे नेतृत्व चर्चेत आले आहे. या वर्षाच्या अखेरीला देशात मध्य प्रदेश, मिझोरम आणि राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसने नुकतेच प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना आणले आहे. पदभार घेतल्यावर लगेचच कमलनाथ यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांना विविध प्रश्‍नांवर घेरण्यास सुरुवात केली. याशिवाय कमलनाथ यांनी राज्यात पक्षात असलेली गटबाजीही संपवून टाकली. याशिवाय कमलनाथ यांनी घोषित केलेला प्लॅन सेव्हंटीमुळेही राज्यात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कमलनाथ यांनी आगामी निवडणुकीत 70 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे जाहीर करताना त्यांनी राज्यात कुठल्या जागा काँग्रेस जिंकू शकते, हे गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे राज्यातल्या कुठल्या जागा कमकुवत आहे याचा शोध घेण्यास भाजपने सुरुवात केली आहे. पण हीच गोष्ट छत्तीसगड आणि राजस्थानबाबतीत काँग्रेसमध्ये पाहायला मिळत नाही. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री रमणसिंग यांना अडचणीत आणण्यासाठी राज्याचा विकास, नक्षली कारवाया आणि पत्थलगडी यांसारख्या मुद्द्यांवर भर देणारी रणनीती आखली आहे. कर्नाटक जिंकल्यावर या तीन राज्यांमध्ये भाजपला चारी मुंड्या चीत करू, अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होती. पण आता निकालानंतर परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील निकालानंतर या राज्यांमधील काँग्रेस कार्यकर्त्याचे मनोबल खचेल, अशी शंका राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील अपयशामुळे या राज्यांमध्ये काँग्रेससमोर असणारे आव्हान आणखी वाढले आहे. या तिन्ही राज्यांमध्ये सत्ताधार्‍यांविरोधात असलेल्या वातावरणाचा फायदा मिळण्याची फार कमी शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

पोटनिवडणुकांचा अपवाद वगळता देशातील विविध विधानसभांच्या निवडणुकीत होत असलेल्या पराभवांमुळे काँगे्रसला आपल्या रणनीतीबाबत नव्याने विचार करायला लागणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल याची अपेक्षा बाळगली जात होती. पण कर्नाटकमधील निकालांमुळे आगामी काळात या दोन्ही राज्यांमधील परिस्थितीत बदल होऊ शकतो. त्यामुळे कदाचित काँग्रेसचे मोठे नुकसानही होऊ शकते.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी निकालानंतर आपला बाण सोडताना, इंडियन नॅशनल काँग्रेसने आपले नाव बदलून काँग्रेस-पंजाब, मिझोरम, पुड्डुचेरी, असे ठेवायला पाहिजे असे सांगितले. यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना, मोदी हे जगातील सर्वात बलशाली नेते असून, अमित शहा भाजपचे चाणक्य असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी या यशामुळे भाजपसाठी दक्षिणेचा दरवाजा उघडला असून, तो पुढे कन्याकुमारीपर्यंत जाणार असल्याचा उच्चार त्यांनी केला.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी आगामी विधानसभाच्या निवडणुकीत छत्तीसगडसह मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही भाजपचेच वर्चस्व राहील, असे स्पष्ट केले. पंतप्रधानांनी भेदभाव न करता समाजातील सर्व स्तरावर विकास केला आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेसला शोधा, हा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई