पुणे । पुणे कॅम्प भागातील हिंद तरूण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात भारत-चीन युध्दावर आधारित स्वदेशीचा संदेश देणारा देशभक्तीपर जीवंत देखावा सादर केला आहे. 20 कलाकार व ध्वनीचित्रफीतीच्या सहाय्याने सादर केलेल्या या देखाव्यात चीनी वस्तूंचा भारतात वाढलेला प्रभाव रोखण्यासाठी 1962 साली चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसून युध्दाला कसे भाग पाडले व सध्या भारत-चीन सीमेवरील युध्दजन्य परिस्थिती कशी आहे याची मांडणी केली असून युध्दातील गोळीबार, बाम्बहल्ले याचे हुबेहूब दर्शन घडविले आहे.
1 लाखांचा जय गणेश भूषण पुरस्कार
मंडळाचे यंदा 57 वे वर्ष असून नुकताच मंडळाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सर्वांगीण कार्याकरीता रूपये 1 लाखांचा जय गणेश भूषणहा पुरस्कार मिळाला आहे. मंडळातर्फे वर्षभर मोफत रूग्णवाहीका व शववाहीनी सेवा, विद्यार्थी दत्तक योजना, महिलांना मोफत अपघाती विमा वितरण, आरोग्य तपासणी शिबिर, वारकरी बांधवांना भोजण व साहित्य भेट, वृक्षारोपण आदी विधायक उपक्रम राबविले जातात. तसेच वर्षभरात नवरात्र उत्सव शिवजयंती उत्सव, हिंदु नववर्ष दिन, गणेश जयंती, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन आदी सण साजरे केले जातात. मंडळातर्फे संपूर्ण परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
हुबेहुब अखेरची सलामी
या देखाव्यातून तत्कालीन युध्दातील शहीद जवान सत्यजित गायकवाड यांना शवपेटीतून आणून बंदूकीच्या सहाय्याने दिलेली अखेरची सलामी याचीही वास्तववादी मांडणी केली आहे. देखाव्याच्या शेवटी प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करून चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे हा देशभक्तीपर संदेश मंडळाने दिला आहे. या देखाव्याची संकल्पना हिंद तरूण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गिरमकर यांची असून निलेश यादव हे यंदाच्या वर्षीचे अध्यक्ष आहेत.