अभंगांचे विडंबन करणार्‍यांवर कारवाई करणार

0

पिंपरी-चिंचवड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग गाथा म्हणजे मराठी काव्याचे शाश्वत भूषण आहे. परंतू गाथेतील अभंगाचा शब्दरूपी खेळ करून काही लोक समाजमाध्यमांव्दारे (सोशल मिडिया) मजकूर पाठवत असतात. वास्तविक एक एक अभंग जीवनाचा सार असताना उथळ प्रतिभेत त्याचा वापर करण्याची विकृती अलिकडे निर्माण झाली आहे. यामुळे समस्त वारकरी सांप्रदाय व जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत. मुळ गाथा अभ्यासली नसल्याने आलेला मजकूर तसाच पुढे पाठविण्याच्या सवयीमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे. आता अशी टिंगलटवाळी खपवून न घेता व्हॉटस्अ‍ॅप किंवा फेसबुकवर असा मजकूर असणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निगडी येथील वारकरी संप्रदायाचे अभ्यासक दीपक खैरनार यांनी पत्रकाव्दारे दिला आहे. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त यांनाही याबाबत निवेदन दिले आहे.

कृपया, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकवर मजकूर नको
निवेदनात म्हटले आहे की, ‘तुका म्हणे अ‍ॅडमिन पार्टी देतोय का?’, ‘तुका म्हणे न्यू इयरची लागली आस’ या सारखे चित्र विचित्र चिन्हांचा वापर केलेले मेसेज, व्हॉटस्अ‍ॅप तसेच फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर काही समाजकंटकांकडून पोस्ट करण्यात येत आहेत. असे मेसेजेस पोस्ट करणा-यांवर गुन्हे दाखल करून अशा अपप्रवृत्तींना आवर घालणे गरजेचे आहे. जगाच्या कल्याणासाठी संत तुकाराम महाराजांनी अभंग गाथा लिहिली. त्या अभंगांची विटंबना होणे उचित नाही. असा प्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्ती आणि व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन तसेच फेसबुकवर पोस्ट करणार्‍या व त्यास समर्थन दर्शवणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असा काही प्रकार आढल्यास आमच्या सामाजिक संघटनेच्या वतिने आपणाकडे रितसर तक्रार दिली जाईल.