पुणे : ‘एकदंत भालचंद्र वक्रतुंड मोरया…गोरज मुहूर्ता तुजला गणेशा… देवा लंबोदर गिरीजा वंदना, पूर्ण करी मम कामना…’ यांसारख्या एकाहून एक सरस रचना सादर करीत दोन दिग्गज गायकांनी रसिकांची मने जिंकली. संतांच्या अभंगांपासून ते नाटयसंगीतातील विविध रचनांची पेशकश करीत पं.रघुनंदन पणशीकर आणि आनंद भाटे यांनी गणरायाचरणी गानसेवा अर्पण केली. पुणे : ‘एकदंत भालचंद्र वक्रतुंड मोरया…गोरज मुहूर्ता तुजला गणेशा… देवा लंबोदर गिरीजा वंदना, पूर्ण करी मम कामना…’ यांसारख्या एकाहून एक सरस रचना सादर करीत दोन दिग्गज गायकांनी रसिकांची मने जिंकली. संतांच्या अभंगांपासून ते नाटयसंगीतातील विविध रचनांची पेशकश करीत पं.रघुनंदन पणशीकर आणि आनंद भाटे यांनी गणरायाचरणी गानसेवा अर्पण केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अभंग आणि नाट्यसंगीत सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘संगीत शाकुंतल’ या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘पंचतुंड नररुंड मालधर…’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. किशोरी आमोणकर यांनी संगीतबद्ध केलेल्या हंसध्वनी रागातील गणेशाला वंदन करणार्या ‘गणपत विघ्नहरण गजानन…’ या गीताला श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. डॉ. सुनील साठे लिखित ‘गोरज मुहूर्ता तुला गणेशा…’ या रघुनंदन पणशीकर यांनी सादर केलेल्या रचनेने रसिक मंत्रमुग्ध झाले. उत्तरोत्तर रंगलेल्या हा स्वरमैफलीमध्ये माउली टाकळकर यांनी संत नामदेव यांची रचना असलेल्या ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा…’ या गाण्याच्या सादरीकरणाला टाळ वादनाने सुरेल साथ दिली. मैफलीत संगीत नाटकांतील विविध नादलहरींच्या सादरीकरणाने रसिक तृप्त झाले. ‘मुरलीधर शाम हे नंदलाल…’ या कट्यार काळजात घुसली नाटकातील प्रख्यात रचनेच्या सादरीकरणाने रसिकांना तृप्त केले. दोन्ही दिग्गज गायकांना भरत कामत (तबला), राजीव परांजपे (ऑर्गन), माऊली टाकळकर (टाळ), प्रसाद जोशी यांनी साथसंगत केली. मिलींद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.