शहादा । प्रकाशा, ता. शहादा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दक्षिण काशी या तीर्थस्थानी ‘स्वच्छ तापी, सुंदर भारत’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थी परिषदेच्या स्वयंसेवकांनी मंदिर परिसरातील घाटावर स्वच्छता केली. तसेच नदीपात्रात व किनारी पडलेल्या अर्धवट तुटलेल्या मूर्ती, प्रतिमा, पूजेचे उरलेले साहित्य, निर्माल्य हे वेगवेगळे करून तो घाट स्वच्छ करण्यात आला. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पूजा केल्यानंतर साहित्य, मूर्ती, निर्माल्य, देवदेवतांच्या प्रतिमा नदीत विसर्जित केल्या जातात. त्यामुळे पाणी दूषित होते. यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नदी स्वच्छ ठेवण्याची शपथ यावेळी विद्यार्थी व नागरिकांनी घेतली.
नदीचा र्हास रोखावा
विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ. गिरीश पवार यांनी नदीचे स्थान महत्त्वाचे असून नदीचा र्हास टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्वार्थ व अज्ञानापोटी आपण नदी दूषित करीत आहोत. येणार्या पिढीला नदी व तिचे महत्त्व पटवण्याकरिता नदी टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मूर्ती हौदात किंवा घरी पाण्यात विसर्जित करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. या अभियानात प्रा.डॉ. गिरीश पवार, रुपेश पाटील, विपूल पवार, दिगंबर पवार, धनंजय कोकणी, नीलेश हिरे, हार्दिक वाघेला, आकाश अंभोरे यांच्यासह विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला.