अभाविपच्या प्रदेश अधिवेशनासाठी येणार अडीच हजार प्रतिनिधी

0

जळगाव । दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक मुद्दांवर विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्रातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहतात व ते विविध विषयावर चर्चा करतात. यावर्षीचे 52 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन जळगाव येथे 24 ते 26 डिसेंबर दरम्यान होणार असून या तीन दिवशीय अधिवेशनासाठी राज्यातील अडीच हजार प्रतिनिधी येणार असल्याची माहिती अभाविपचे प्रदेश मंत्री राम सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवतीर्थ मैदान येथे अधिवेशन होणार असून अधिवेशनाच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जळगाव महानगर प्रमुख विराज भामरे, भानुदास येवले आदी उपस्थित होते. अधिवेशनाची मध्यवर्ती कल्पना ‘संस्कारयुक्त रोजगाराभिमुख शिक्षण’ अशी असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

24 रोजी उद्घाटन
शहरातील शिवतीर्थ मैदान येथे हे अधिवेशन होणार असून त्यास स्व.डॉ.अविनाश आचार्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. रविवारी 24 रोजी सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून स्कायडायव्हिंग सारख्या साहसी खेळामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणर्‍या पद्मश्री शितल महाजन, बिहार राज्यातील पाटणा येथे आयआयटी प्रवेश परिक्षेसाठी चालवणार्‍या ‘सुपर 30’ प्रशिक्षणाचे उद्गाते आनंद कुमार उपस्थित राहणार आहे.

ज्वलंत विषयावर चर्चा
तीन दिवस चालणार्‍या या अधिवेशनात विद्यार्थ्यांसमोर विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील चार प्रस्तावांवर चर्चा होईल. अधिवेशनामध्ये सध्या समाजात चालू असलेल्या ज्वलंत विषयावर माहितीसाठी समांतर सत्र असणार आहेत. यामध्ये जीएसटी, स्वदेशी असे विषय असणार आहे. स्वयंरोजगार, रोजगारनिर्मितीत शासनाची, शिक्षणाची भूमिका आणि त्याबाबतचा समाजाचा दृष्टीकोण या विषयावर प्रस्ताव पारित करण्यात येणार असून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

शहरातून शोभायात्रा
अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी 25 डिसेंबर रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता शिवतीर्थ मैदान येथून शोभायात्रेस प्रारंभ होणार असून सुभाष चौक येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे. शोभायात्रेत उंट, हस्ती, घोडे हे आकर्षणाचे विषय असणार आहे. शोभायात्रेला मोर्चाचे स्वरुप येणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याचे भानुदास येवले यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी 225 प्रतिनिधी परिश्रम घेत आहेत.