पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे दीर्घकाळ पडून आहे. येत्या महाराष्ट्र दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाण्याबाबतची घोषण होऊ शकेल, असे सूत्रांकडून जनशक्तिला सांगण्यात आले.
मराठीला अभिजातचा दर्जा तातडीने दिला जावा, यासाठी गेल्या काही काळापासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेसह राज्यातील साहित्य, रंगभूमी व अन्य क्षेत्रांकडूनही यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. मात्र, केंद्राकडून याबाबतच्या घोषणेस का विलंब केला जात आहे, असा प्रश्न केला जात आहे. अभिजात भाषेच्या दर्जासाठी केंद्राने काही निकष निश्चित केले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने सखोल संशोधन करून मराठी या निकषांवर कशी खरी उतरते याबाबतचा प्रस्ताव केंद्राला सादर केला आहे. मराठीला हा दर्जा दिला जावा, अशी भूमिका देशातील काही प्रमुख भाषातज्ज्ञ व साहित्यिकांनीही घेतली असून, केंद्राला तशी सूचनाही केली आहे. त्यामुळेही अभिजातची घोषणा लवकर केली जावी, या मागणीला जोर आला आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेच्या गेल्या अधिवेशनात लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, केंद्राने तातडीने ही घोषणा करावी, असी मागणी केली होती. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनीही बारणे यांच्या या मागणीला सभागृहात पाठिंबा दर्शवला होता. महाजन यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तरी केंद्र सरकार या प्रस्तावाचा गांभिर्याने विचार करेल, असे मानले जात होते.
आता हा प्रस्ताव मान्येच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाने हा प्रस्ताव मागवला असून, हे कार्याल त्यावर विचारविनिमय करत आहे. यापूर्वी ज्या समित्यांकडे हा प्रस्ताव सादर केला गेला होता, त्या समित्यांनी यावर कोणते अभिप्राय दिले आहेत, याचाही अभ्यास केला जात आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळापुढे जाणे आवश्यक आहे. तसा तो या महिनाअखेरपर्यंत सादर केला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. पठारे समितीतील सदस्य असलेले ज्येष्ठ अभ्यासक हरी नरके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही यास दुजोरा दिला. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव मागवून घेतल्याचे आम्हालाही कळाले आहे. मात्र, अधिकृतरित्या त्याची माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही. जर पंतप्रधान कार्यालयाकडे हा प्रस्ताव गेला असेल, तर महाराष्ट्र दिनी अभिजात मराठीची घोषणा होऊ शकेल. याबाबत आम्हीही आशावादी आहोत, असे नरके यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.