अमळनेर । राज्यातील विविध जिल्ह्यात मागीत तीन वर्षांत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदानातून पाणी समस्या सोडवण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यांत यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. या श्रमदानात मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आपला खारीचा वाटा उचलताना दिसतात. आलिया भट्ट, अक्षय कुमार, सई ताम्हणकर यांसारख्या अनेक कलाकारांनी पाणी फाऊंडेशनसाठी श्रमदान केले आहे.
गावात नेहमीप्रमाणे श्रमदान सुरू होते. मात्र आपल्या गावात आमिर येणार असल्याचे कळताच तिथल्या जनतेत एकच उस्ताह संचारला आणि सर्वच जोमाने श्रमदान करु लागले. साधारणतः सकाळी साडेआठच्या सुमारास गावी पोहोचला. धुळे येथून नवलनगर मोहाडी मार्गे जवखेडा ता.अमळनेर गावी पोहचला त्यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी आमिर खानने गावाच्या तरुणींनी सादर केलेल्या पाणी फाऊंडेशन वरील अहिराणी गित ‘चैत्र ना महिनामा, जागृत व्हयनाय, जवखेडाना विकास करणाय’ व ‘जुनं सारं विसरूया, जवखेड्याचा विकास करूया’या गीतांचे मंदिरा समोर चित्रीकरण करण्यात आले. गाव विकासाविषयीच्या गाण्यांना आमिर खान व किरण राव यांनी टाळ्या वाजवून भरभरुन दाद दिली. अहिराणी गीताचा अर्थ समजून घेतला व यावेळी गावाचे काम कसे सुरू झाले याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली व त्यानंतर मंडपात दाखल झाला यावेळी गावकर्यांनी टाळ्यांनी त्याचे स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी रफिक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणी फाउंशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, उज्ज्वला पाटील, युनियन बँकेचे चेअरमन मयूर पाटील, डॉ.दिनेश पाटील, सरपंच सुभाष पाटील, प्रा. सुनील पाटील, माजी जि.प.सदस्य संदीप पाटील, पं.स. सभापती वजाबाई भिल अनेक कार्यकर्ते व चाहत्यांची उपस्थिती होती.