मुंबई : राजा विक्रम याच्या जादुई रहस्यमय गोष्टी आणि थक्क करून सोडणारा वेताळ यांचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. ही अतुलनीय कथा पुन्हा एकदा अद्भुतपणे ‘अँड टीव्ही’वर साकारणार आहे. विक्रम-वेताळच्या गोष्टीला आजच्या काळाशी जोडण्याचा प्रयत्न ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा!’ या मालिकेद्वारे करण्यात आला आहे. अभिनेता अहम शर्मा हा न्यायी राजा विक्रमादित्याच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हरहुन्नरी रंगभूमी आणि चित्रपट कलाकार मकरंद देशपांडे चलाख चतुर वेताळाच्या भूमिका साकारणार आहेत. तर दिग्गज अभिनेता सूरज थापर शक्तिशाली भद्रकालची भूमिका निभावणार आहे. या मालिकेत इशिता गांगुली, अमित बहल, सोनिया सिंग आदी कलाकारांचा समावेश आहे.
तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा छोट्या पडद्याकडे वळलेले अभिनेते मकरंद देशपांडे वेताळाच्या भुमिकेविषयी म्हणाले की ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा’ मालिकेत वेताळाचे पात्र रंगविण्यासाठी मला सांगण्यात आल्यापासून मी उत्सुक होतो. वेताळ हा भूत असला तरी तो चतुर, चलाख आहे. ज्याला आपल्या कुवतीनुसार माणसांची मदत करण्याची इच्छा आहे. कोडय़ांमधून अतिशय चलाखीने आणि हुशारीने महान राजा विक्रमादित्यला आव्हाने देण्याच्या त्याच्या पद्धतीमधून या पिशाच्चाची कुशाग्र आणि मनमोकळी बाजू समोर येते. म्हणूनच ही भूमिका आपल्याला आवडल्याचे त्यांनी सागितले.