मुंबई : जेष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले आहे. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते.
अभिनेते रमेश भाटकर यांच्या ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या टीव्ही मालिकां खूप गाजल्या. गायक – संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी 3 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम असायचा. काही दिवसांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते.
रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असून रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.