अभिनेता शत्रूघ्न सिन्हांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

0

पटना-अभिनेते आणि भाजप खासदार शत्रूघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या स्थापना दिनीच त्यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या तिकिटावर खासदार झाले मात्र त्यांना भाजपचे ध्येय धोरणे आवडली नाही, त्यामुळे ते भाजपवर नाराज असून सातत्याने टीका देखील करतात. सिन्हांना लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पाटना साहिबहून उमेदवारी दिली जाणार आहे. जड अंतकरणाने भाजप सोडत आहे असे यावेळी सिन्हा यांनी सांगितले.

२०१४ मध्ये लोकसभेवर निवडून गेल्यावर अवघ्या २ वर्षांतच सिन्हांनी भाजपचा उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली. तिसऱ्या आघाडीच्या सभांनाही शत्रूघ्न सिन्हांनी हजेरी लावली. सतत पक्षविरोधी प्रचार केल्यामुळे, भाजपने सिन्हा यांना पक्षातून हकलले नसले तरी पाटना साहिबहून उमेदवारी मात्र नाकारली आहे. त्यांच्याजागी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांना तिकीट देण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी ,अखिलेश यादव या सर्वांनीच शत्रूघ्न सिन्हा यांना ‘आमच्या पक्षात या’ अशी विनंती केली होती. पण पाटना साहिबहून जो पक्ष मला उमेदवारी देईल त्याच पक्षात मी प्रवेश करीन असे सिन्हा यांनी आधीच स्पष्ट केले होते.

यासंदर्भात काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आघाडीच्या गणितांमुळे पाटना साहिबहून तिकीट देणे अवघड असले तरी तुम्हाला उमेदवारी देण्याचं प्रयत्न करू असे आश्वासन गांधींनी सिन्हांना दिले होते. त्यानुसार काँग्रेसने सिन्हांची मागणी मान्य केली असून ते लवकरच प्रचाराला सुरुवात करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटकपक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच सिन्हा मात्र काँग्रेसची वाट धरत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.