नवी दिल्ली: कलाकारांच्या राजकारणात येण्यामुळे तामिळनाडूचे राजकारण लयाला गेले आहे, भ्रष्टाचाराने बरबटले आहे. अशी टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर ते त्यांचे चुकीचे पाऊल असेल तसेच दाक्षिणात्य राजकारणात प्रवेश करण्यासाठी रजनीकांत तिथल्या राजकीय तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. यावर विचार विनिमय करुन आपण निर्णय घेऊ असे त्यांनी नुकतेच म्हटले होते. मात्र त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशावरच सुब्रमण्यम यांनी एकप्रकारे आडकाठी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे.
कलाकारांना राजकीय प्रवास लाभदायी
तामिळनाडूच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या देखील एकेकाळी अभिनेत्रीच होत्या. बेहिशेबी मालमत्ता, संपत्ती यामुळे त्यांच्यावर खटलाही सुरू होता. मात्र त्यांना अम्मा ही उपाधी देऊन लोकांनी त्यांना थेट देवाचाच दर्जा दिला होता. अभिनेते रजनीकांत यांनाही लोक देव मानतातच. अशात त्यांना राजकारणातही यायचे आहे. चिरंजिवी असोत, जयललिता असोत किंवा आता रजनीकांत असोत राजकारणात आल्यावरही जनता त्यांना पुन्हा डोक्यावर घेण्याचीच शक्यता अधिक आहे. यापार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात जे अभिनेते-अभिनेत्री येतात त्यांची भाषणे स्क्रिप्टेड असतात. इतकेच नाही तर त्यांच्याकडे काळा पैसाही मोठ्या प्रमाणावर असतो. अभिनेत्यांच्या या धोरणांमुळे तामिळनाडू हे एक भ्रष्ट राज्य झाले आहे, अशी टीकाही स्वामी यांनी केली आहे.
रजनीकांत हे निरक्षर आहेत आणि राजकारण हा त्यांचा मंच नाही ते राजकारणासाठी अगदीच अनफिट आहेत.
खा. सुब्रमण्यम स्वामी,
भाजप नेते